लोकमान्य टिळक

बाळ गंगाधर टिळकबालपणलोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीमधील मधल्या आळीत,एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती.वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला.तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्युपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.

 शेंगांची गोष्ट

ते शाळेत असतांनाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणार्‍यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणार्‍या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

 कसरतीचे महत्त्व

१८७२ मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्विकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारिरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी व्यायामशाळेला जाणे चालू केले आणि नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परिक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारिरीक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.

कॉलेज जीवनडेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांना अनेक मान्यवंत शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्सवर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रूची वाढवली तर गणित शिकवणार्‍या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेंसर, मिल, बेंथम, व्हॉल्तेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल.एल.बी. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रूची आणि संशोधनाची आवड पाहता एल.एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, " ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतित होईल."

 टिळक-आगरकर मैत्री व वाद

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांची मैत्री आगरकरांबरोबर झाली. दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भारलेले होते. ते मिळून युरोपियन लेखकांची राजनीती, अर्थशास्त्र आणि सामाजिक परिवर्तनावरील पुस्तके वाचत आणि त्यावर चर्चा करत. जेव्हा त्यांनी डेक्कन कॉलेज सोडले, तेव्हा त्यांनी दोन निश्वय केले होते. एक म्हणजे सरकारी नोकरी नाही करायची आणि दुसरे म्हणजे आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे. टिळक आगरकर हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते पण देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मतांतरामुळे दोन परममित्रांमध्ये वादाची दरी उभी राहिली. स्वातंत्र्याआधी समाज सुधारला पाहिजे, तसे झाले तरच स्वातंत्र्याला अर्थ उरेल असे आगरकरांचे मत होते तर समाजसुधारणेला बराच वेळ लागेल, स्वातंत्रासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही असे टिळकांचे म्हणणे होते. या वादामुळेच या द्वयीने एकत्र काम करणे सोडलं, मूळच्या गरीब घराण्यातल्या आगरकरांनी प्रचंड दारिद्र्य अनुभवून वयाच्या अवघ्या चाळिशीत देह ठेवला.

 न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्यूकेशन सोसायटी

समाजपरिवर्तन शिक्षणाशिवाय अशक्य आहे असे टिळक व आगरकर दोघांचेही मत होते. त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर,जे सरकारी शाळेत शिक्षक होते, यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तात्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्यूकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. १८८३ च्या सुमारस त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर. विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रूपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्गसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यवहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थाने स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि २ जानेवारी १८८५ ला फर्गसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपुर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.
पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर १८९० मध्ये टिळकांनी संस्थेचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांमध्ये संपादन करू लागले.

 


अभ्यासिकेत टिळक


दु्ष्काळ व प्लेगची साथ
याच काळात भारतीयांना दोन भयानक आपत्तींना सामोरे जावे लागले. ते म्हणजे १८९६ चा दुष्काळ आणि १८९७ ची गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ. दुष्काळ भारतीय शेतकर्‍यांसाठी नवीन नव्हता. पण यावेळी टिळकांनी त्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. केसरी द्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकर्‍यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरी द्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिक व दुकानदारांना अन्न व पैसा दान करण्याचे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या.
त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे सरकारने त्याचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न करणे चालू केले व त्यासाठी रॅंड नावाच्या एका अधिकार्‍याची नियुक्ती केली. त्याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याने रोगग्रस्त लोकांना वेगळे करणे चालू केले. पण या काळात अनिर्बंध सैन्याकडून लोकांवर अनेक अत्याचार झाले. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. तसेच घराच्या निर्जंतुकीकरणात घरातील देव,देवघरांचा मान ठेवला गेला नाही. घरातील वृद्ध तसेच स्त्रीयांवर अत्याचार केले गेले. लोकांना प्लेगपेक्षा रॅंड आणि ब्रिटिश सैनिकांची जास्त भिती वाटायला लागली. टिळकांनी केसरी व मराठाच्या माध्यमातून यावर तोफ डागली. ते निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता.  २३ जून १८९७ ला दामोदर चाफेकरांनी रॅंड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून ह्त्या केली. सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रॅंडच्या हत्येच्या कटात सामिल असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले.

 पहिला राजद्रोहाचा खटला व तुरूंगवास

रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टिकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, रँडच्या खुनाचा संबंध टिळकांशी जोडण्यात अपयश आल्यानंतरही ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. या दोन लेखांमध्ये भवानी तलवार या टोपणनावाखाली लिहिलेली दृष्टांतरूपी कविता व शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध योग्य होता असे मत मांडणार्‍या टिळकांच्या वक्तव्यावरील वृत्त यांचा समावेश होता.  या खटल्याची सुरुवात सप्टेंबर ८ , १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली. एकूण नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय पंच व तीन भारतीय पंच होते. टिळकांच्या बचावासाठी पूर्ण देशभरातून जवळपास ४०,००० रूपये इतका निधी गोळा करण्यात आला. यामध्ये डब्ल्यू.सी. बॅनर्जी, मोतीलाल घोष (अमर बाझार पत्रिकाचे संपादक) व रविंद्रनाथ टागोर या बंगालच्या नेत्यांचा तसेच जनतेचा वाटा उल्लेखनीय होता. यासोबतच बंगालमधून टिळकांची बाजू मांडण्यासाठी वकीलसुद्धा पाठविण्यात आले. हा खटला सहा दिवस चालला व खटल्याच्या शेवटी तीन भारतीय पंचांनी टिळकांकडून निकाल दिला तर सहा युरोपीय पंचांनी टिळकांविरुद्ध. न्यायाधीश जस्टिस स्ट्रॅची यांनी बहुमतानुसार टिळकांना दोषी घोषित केले व १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निकालादरम्यान "Disaffection" (सरकारबद्द्ल अप्रीती) म्हणजे "want of affection" (प्रीतीचा अभाव) या न्यायाधीशांनी केलेल्या व्याख्येवर भारतात तसेच इंग्लंडमध्ये अनेक कायदा-अभ्यासकांनी प्रखर टिका केली टि़ळकांना तीन महिन्यासाठी डोंगरी तुरूंगात ठेवण्यात आले व नंतर भायखळ्याच्या तुरूंगात हलविण्यात आले. तुरूंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याप्रमाणे न वागवता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. याचा संस्कृत विद्वान व टिळकांचे परिचित मॅक्स म्यूलर यांनी तसेच इंग्लंडमधील काही नेत्यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे सरकारने टिळकांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविले तसेच त्यांना तुरूंगात काही काळ वाचनाची व लिखाणाची मुभा दिली. तुरूंगवासादरम्यान टिळकांनी आर्क्टिक होम ऑफ वेदाज या त्यांच्या पुस्तकासाठी टिपणे बनविली.[ जेव्हा बारा महिन्याच्या तुरूंगवासानंतर सप्टेंबर ७, १८९८ रोजी टिळकांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यांचे शारिरिक स्वास्थ्य खूप ढासळले होते.

 

 


लाल(लाला लजपतराय), बाल(बाळ गंगाधर टिळक), पाल(बिपिनचंद्र पाल)

जहालवाद विरूद्ध मवाळवाद

बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा

होमरूल

लखनौ करार

गणेशोत्सव व शिव जयंती

इंग्रजांचे अंध अनुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?" त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते एक हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरूज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. अशा रीतीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरित्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी ऎहिक (secular) विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना अशी आदर्श व्यक्ती मिळाली जिच्या अनुकरणाने लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांचा विश्वास होता. शिवाजी महाराज फक्त ब्राह्मणांचे नव्हते किंवा फक्त ब्राह्मणेतरांचे पण नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते. या कारणांनी त्यांनी शिव जयंतीची सुरुवात केली. तसेच त्यांनी भारतभर दौरे करून लोकांना शिव जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विशेषतः बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव जोराने सुरु झाला.

 पत्रकारिताकेसरीतील अग्रलेखटिळकांनी आगरकर, चिपळुणकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने १८८१ साली केसरीमराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. केसरीचा मुख्य उद्देश अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्‍या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परिक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये तात्काळ प्रसिद्ध झाले. १८८२ त्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही ' केसरी ' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वत:कडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरुच् नव्हेत्', ' बादशहा ब्राह्माण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

साहित्य आणि संशोधन

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नाविण्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत,
 • The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
 • वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
 • टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
 • टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
 • Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित.


कुटुंब

कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्‍वनाथही प्लेगला बळी पडला.
पत्नी चा देहांत ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी नी सांभाळली. पण त्यांची धाकटी दोन्ही मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात आणि ते आगकर विचारांशी जवळीक ठेवणारे होते.
टिळकांच्या विचारसरणीचा राजकीय वारसा न.चि.केळ्कर,... ,... यांनी चालवला

 प्रसिद्ध घोषणा

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

 संदर्भ

 1. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ८
 2. Full and Authentic Report of Tilak Trial - N.C. Kelkar, पृष्ठ १
 3. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ७
 4. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठे ७-९
 5. [http://www.iloveindia.com/indian-heroes/bal-gangadhar-tilak.html बाळ गंगाधर टिळक - चरित्र
 6. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ११
 7. लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अँड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ १३
 8. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ १४
 9. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ २४
 10. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ३६
 11. चाफेकर बंधूंबद्दल माहिती
 12. Touching the Body, Perspectives on Indian Plague, 1896-1900, David Arnold, Subaltern Studies V
 13. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठे ६८-७९
 14. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ८६
 15. १५.० १५.१ Understanding Tilak
 16. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ८७
 17. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठे ८७-८८
 18. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ९५
 19. Lokamanya Tilak, Father of Indian Unrest and Maker of Modern India - D. V. Tahmankar, पृष्ठ ६०
 20. तिखट व धारदार शस्त्र! - महाराष्ट्र टाईम्स, भारतकुमार राऊत
 21. आर्क्टिक होम ऑफ वेदाज ची पी.डी.फ. प्रत.


 बाह्य दुवे